॥ वामनावतार ॥
वामन अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो. श्रीमद् भगवदपुराणात याबद्दल एक
कथा आहे. त्या वामन अवतारकथेनुसार, देव-असुरांच्या
युद्धामध्ये राक्षसांचा पराभव होण्यास सुरुवात होते. पराभूत असुर त्यांच्या
राक्षसांसह मरतात. मग असुरांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी विद्या वापरून
राक्षसांच्या मृत देहांना सजीव करतात.
शुक्राचार्य हे असुरांचा राजा बळीराजासाठी यज्ञ करतात आणि त्याला अग्नीकडून दिव्य रथ, बाण, अभेद्य चिलखत वगैरे मिळवून देतात. त्यामुळे असुरांची शक्ती वाढते व ते सैन्य इंद्राची राजधानी अमरावतीवर हल्ल्याची तयारी करतात. बळीचे शंभर यज्ञ पूर्ण झाल्यावर तो इंद्र होईल अशी इंद्राला भीती वाटू लागते. त्यासाठी इंद्र भगवान विष्णूच्या आश्रयाला जातात. भगवान विष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात, व वाणीच्या रूपात आई अदितीच्या गर्भाशयातून जन्म घेतात. हा जन्म भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात द्वादशीच्या दिवशी होतो. मुलाचे नाव वामन ठेवतात. वामनाचे वडील महर्षि कश्यप ऋषी हे अन्य ऋंषींसमवेत वामनावर उपनयन संस्कार करतात, बटुक महर्षि पुलह हे वामनाला यज्ञोपवीत पुरवतात. त्याला अगस्त्याकडून मृगचर्म, मरीचीकडून पलाश दंड, अंगिरसाकडून कपडे, सूर्याकडून छत्र, भृगूकडून कमंडलू, गुरूकडून कौपीनवस्त्र (लंगोटी), सारिती(?)कडून रुद्राक्षमाला आणि कुबेराकडून भीक मागण्याची पात्रे मिळवून देतात. त्यानंतर, वामन वडिलांच्या आज्ञेने यज्ञात जातात. त्यावेळी राजा बळी नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर शेवटचा यज्ञ करीत असतो. वामन अवतारातील श्रीहरी राजा बळीकडे भीक मागण्यासाठी दाखल होतात. ब्राह्मण झालेला श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावलांची भूमी मागतो. शुक्राचार्यांना यांतला धोका समजतो, ते बळीला नकार देण्यास सुचवतात. पण बळी श्रीविष्णूला तीन पावलांची जमीन देण्याचे वचन देतात. वामन स्वरूपातील विष्णू भगवान एका ढांगेत स्वर्गाला व दुसऱ्या ढांगेत पृथ्वीला व्यापतात. आणि तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारतात. शेवटी राजा बळी भगवंतासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो. अंती, राजा बळीला पाताळलोकात द्वारपाल बनावे लागते. वामनजयंती ही भाद्रपद शुक्ल द्वादशीला असते.
येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबलः |
तेन त्वां मनुबध्नामि, रक्षंमाचल माचल ||
Comments
Post a Comment
Note :- Please keep your comment span freely and respectful.